एसटी चालकास कुऱ्हाडीने धमकावणारा फाळकुट दादा जेरबंद
व्हिजन २४तास न्यूज
श्रीकांत जाधव
प्रतिनिधी | उंब्रज
रस्त्यात एसटीला दुचाकी आडवी मारून चालकास कुऱ्हाड आणि सत्तुराचा धाक दाखवणाऱ्या युवकास अवघ्या एका तासात पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (५ मार्च) उंब्रज (ता. कराड, जि. सातारा) येथे घडली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस स्टेशन उंब्रज मधून मिळालेली माहिती अशी
मनोज अशोकराव पाटील (वय ३८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) हे पाटण ते सातारा ही एसटी बस चालवत असताना उंब्रज येथे प्रवासी उतरवण्यासाठी थांबले. यावेळी राहुल मोहन आटोळे (वय २४, रा. उंब्रज) हा युवक भरधाव दुचाकीवर आला आणि एसटीसमोर दुचाकी आडवी लावली. हातात कुऱ्हाड व सत्तुर घेत त्याने चालकाला धमकी देत एसटी पुढे नेली तर जिवंत सोडणार नाही, असा इशारा दिला. तब्बल १५ मिनिटे हा प्रकार भररस्त्यात सुरू होता.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून काही वेळातच आरोपीला शोधून काढले व जेरबंद केले.
कडक कारवाईचा इशारा
या प्रकरणी आरोपीवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “कायद्याचे उल्लंघन करून दहशत माजवणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला आहे. पुढील तपास ते स्वतः करत आहेत.