एलपीजी टंचाई नाही; घाबरून बुकिंग करू नका – शुभम भारत गॅस एजन्सीचे इंजि. सुनील पोरे यांचे आवाहन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 

देशात एलपीजी संदर्भात निर्माण झालेल्या चर्चांदरम्यान पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने, म्हसवड येथील शुभम भारत गॅस एजन्सीमार्फत नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. एजन्सीचे सर्वेसर्वा इंजि. सुनील पोरे यांनी स्थानिक पातळीवर नागरिकांना उद्देशून महत्त्वाचे आवाहन केले आहे.

इंजि. पोरे म्हणाले की, “केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे देशात एलपीजी गॅसची कोणतीही टंचाई नाही. मात्र सध्या सिलिंडर डिलिव्हरीला थोडा उशीर होत आहे. पूर्वी २ ते ३ दिवसांत मिळणारा गॅस आता ४ ते ५ दिवसांत मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा.”

ते पुढे म्हणाले, “डिलिव्हरी प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी OTP प्रणाली लागू करण्यात आली आहे. ग्राहकांनी OTP केवळ अधिकृत डिलिव्हरी कर्मचाऱ्यालाच द्यावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस OTP देऊ नये.”

सध्याच्या विलंबामागे गॅसची कमतरता नसून ‘पॅनिक बुकिंग’ हे मुख्य कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “अनेक ग्राहक सिलिंडर संपण्यापूर्वीच आगाऊ बुकिंग करत आहेत. त्यामुळे बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली असून वितरण यंत्रणेवर ताण येत आहे,” असे पोरे यांनी सांगितले.

युद्धजन्य परिस्थितीत उभ्या महाराष्ट्रात काही काळ सिलिंडर तुटवडा निर्माण झाल्याची स्थिती होती. तथापि, म्हसवड येथील शुभम भारत गॅस एजन्सीने अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळत कुठलाही ग्राहक नाराज होऊ दिला नाही किंवा कोणालाही दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागले नाही. या यशाचे श्रेय करण भैय्या पोरे, ॲड. शुभम पोरे तसेच एजन्सीच्या सर्व कर्मचारीवृंदाला जाते.

नियमांनुसार, शहरी भागात २५ दिवसांनंतर आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतरच नवीन बुकिंग करता येते. “या नियमांचे पालन करूनच बुकिंग करावे. गरज नसताना बुकिंग टाळल्यास सर्वांना वेळेवर गॅस मिळू शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.

शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले, “अफवांवर विश्वास ठेवू नका. देशात एलपीजी, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शुभम भारत गॅस एजन्सीमार्फत पुरवठा सुरळीत सुरू असून सर्व ग्राहकांना सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *