मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापेक्षा घरातच असलेल्या आपल्या आई-वडिलांचे दर्शन घ्या, कारण जगात आई-बापा सारखे दुसरे कोणतेही दैवत असू शकत नाही, असे मत अकोला येथील प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केले.
अ भा मराठा महासंघ भिगवण शाखा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवरत्न कॉम्प्लेक्स भिगवन येथे आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ‘कवी मनाच्या सामाजिक भावना’ या विषयावर ते बोलत होते याप्रसंगी उद्घाटक म्हणून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपिकाताई क्षीरसागर व प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस गुलाब दादा गायकवाड हे उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले की प्रत्येक धर्म-पंथाची संहिता ही एकच आहे, परंतु त्यातील विकृतीकरणामुळे धर्मा-धर्मात, पंखा-पंथात मतभेद झालेले आहेत. सर्व सामान्य माणूस हा आपल्या गावात राहताना कोणताही धर्म,पंथ न पाहता एकत्रित समाज भावनेने राहतो परंतु आजच्या राजकीय शिकवणीमुळे धर्मात आणि पंथात मतभेद झालेले आहेत. ही बाब प्रत्येक धर्मातील वास्तविकतेला स्पर्श करून आपल्या ‘भोंगा वाजलाय, पुढारी गाजलाय….’ या त्यांच्या गाजलेल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले. वनव्यातही मित्र गारव्यासारखा असतो हे सांगताना ते म्हणाले की, माणसाच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी एखादा मित्र ती संकटे दूर करण्यात कारणीभूत ठरतो. आत्महत्ये पासून जीव वाचवण्याला सुद्धा मित्रच मदत करू शकतो एवढे मित्राचे महत्त्व आहे. त्याकरिता एखादा तरी मित्र आयुष्यात असणे गरजेचे आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता राजकीय क्षेत्रातील लोकांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला असल्याची बोचरी टीका त्यांनी यावेळी केली. यापासून समाजाने सावध व्हावे आणि तरुणांनी त्यांच्या मागे न लागता आपल्या उज्वल आयुष्याचा विचार करावा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. सुमारे दीड-पावणे दोन तासांच्या आपल्या व्याख्यानात मिस्कील विनोदाने श्रोत्यांची मने त्यांनी जिंकून घेतली.
यावेळी मराठा महासंघाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या पुढचे पाऊल या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रायोजक प्रतिनिधी म्हणून श्रीनाथ पतसंस्थेच्या सौ. तृप्ती जाधव, श्री श्रेयस इंडस्ट्रीज बारामतीचे उद्योजक विष्णू काळे, भिगवण मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ. दत्ता पाटील व संस्कृती टूर्स अँड ट्रॅव्हल्स भिगवण स्कूल बसचे संचालक अनिल गलांडे हे उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत महासंघाचे मार्गदर्शक बिराज माने, अर्जुनबाप्पू शिरसाट, मानसिंगराव जाधव, प्रा. रामदास झोळ ,राजेंद्र धांडे, सौ.शालनताई कदम, सौ. संध्या वाघ, सौ. संगीता मोरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयप्रकाश खरड, प्रास्ताविक राजकुमार मस्कर आणि प्रायोजकांची यशोगाथा वाचन डॉ. संकेत मोरे यांनी केले. पांडुरंग वाघ यांनी घेतलेल्या वंदेमातरम् नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.