यात्रा कालावधीतील म्हसवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहन व चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार :.सपोनि भुजबळ
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत श्री सिद्धनाथ देवाची वार्षिक यात्रा माहे डिसेंबर महिन्यात ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून नमूद कालावधीत सुमारे चार ते पाच लाख भाविक येत असल्याने यात्रा कालावधीत म्हसवड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येत असतात तरी सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ न देता यात्रा शांततेत पार पडणे महत्त्वाचे असते याकरिता येणारे भाविक व त्यांच्या वाहनांकरिता रथ मिरवणूक मार्ग, शहर व यात्रा परिसरास जोडले गेलेल्या रस्त्यावरील वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस राजकुमार भूजबळ यांनी दिली
येथील यात्रा रविवार ते शुक्रवार (ता. ११ ते १५) या कालावधीत होणार आहे. बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानच्या उत्सवमूर्तींची येथील रिंगावण पेठ यात्रा मैदानातून चारचाकी रथातून नगरप्रदक्षिणेसाठी
मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी व रथ मिरवणूक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी बुधवारी सकाळी सहा ते रात्री ११ पर्यंत या रथ मार्गावरून नियमित होणारी वाहनांची वाहतूक बंद करून या वाहनांसाठी पर्यायी रस्त्यांची सुविधा करण्यात आली आहे.
सातारा-म्हसवड- पंढरपूर या महामार्गावरून नियमित येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतुकीत बदल करून साताऱ्याकडून येणारी चार, तीन व दुचाकी वाहने शिंगणापूर चौकातून माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांच्या निवासस्थानासमोरून शिक्षक कॉलनी ते भाटकी गावातून म्हसवड अकलूज रस्ता मागें म्हसवड येथील माळशिरस चौकातून वळविण्यात येणार आहेत.
मोठ्या व अवजड वाहनांकरिता पर्यायी मार्ग पोळ पेट्रोल पंपाचे पाठीमागून ते खांडेकर तालीम शिक्षक कॉलनी भाटकी रोड भाटकी गाव ते माळशिरस रस्ता माळशिरस चौक अशी वळविण्यात येणार आहेत. तसेच दिघंची, आटपाडी शेनवडी बाजूकडून येणारी व पुणे बाजूकडे जाणारी वाहतुक वीरकरवाडी चौकातून मेगासिटी नागोबा मंदिर कुकुडवाड रोड अशी वळवण्यात येणार आहेत
जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार यात्रा कालावधीतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहन व चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगीतले