म्हसवड बाजारात चोरीचा धडाका: महिला ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

शहरातील अठवडा बाजारात एका महिलेच्या पर्समधून १ लाख २५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बनगरवाडी येथील छाया सुरेश बनगर या बुधवारी म्हसवड बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांनी मुलीचे घाटवून आणलेले सोन्याचे गंठण व १ हजार रुपये रोकड असलेले पाकीट ठेवले होते. खरेदीदरम्यान, कोणीतरी त्यांच्या पर्समधून पाकीट लंपास केले. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्या व्यथित झाल्या आणि बाजारात गोंधळ उडाला.

चोरीची माहिती मिळाल्यावरही पोलीस घटनास्थळी तीन तासांनीही पोहोचले नाहीत, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीस वेळेत पोहोचले असते, तर चोरट्याला पकडण्याची शक्यता होती. मात्र, या प्रकाराने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

म्हसवडचा अठवडा बाजार हा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि व्यापारी येतात. मात्र, बाजारात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. यापूर्वीही बाजारात अनेक चोरीच्या घटना घडल्या असून पोलीस कारवाईचा अभाव कायम असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

महिलांच्या वस्तू चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने वाढत असून यामुळे बाजारात खरेदी करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “पोलीस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करावी आणि चोरट्यांविरोधात कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जर चोरीचा बळी एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असती, तर पोलीसांनी अशेच दुर्लक्ष केले असते का? हा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांनी यापुढे बाजारात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली असून अशा घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलली जावीत, असे स्पष्ट मत व्यक्त केले जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!