दिव्यांग बांधवांचे काम प्रेरणादायी: मंगेश चिवटे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

श्रीकांत जाधव उंब्रज कराड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उंब्रज येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरात दिव्यांग बांधवांनी रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी स्वतः 38 वेळा रक्तदान केले आहे. प्रत्येकाने दर तीन ते सहा महिन्यांनी रक्तदान करावे. या शिबिरात दिव्यांग बांधवांनी रक्तदान केल्याचे पाहून आनंद वाटतो. समाजाने यापासून प्रेरणा घेतली पाहिजे.”

या शिबिरात 50 हून अधिक युवकांनी रक्तदान केले, त्यांना प्रतिष्ठानकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच परिसरातील 40 पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांना मोफत मॉड्युलर हात-पाय देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. पुढील महिन्यात त्यांना हे सहाय्यक अवयव वितरित केले जाणार आहेत.

याशिवाय, नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डोळे तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले, तर मोतीबिंदू निदान झालेल्या 60 हून अधिक रुग्णांवर पुण्यातील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिराच्या यशस्वी आयोजनात शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. या प्रसंगी गांधी फाउंडेशनचे धीरज गांधी, वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष राम राऊत, सातारा सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, उंब्रज येथे साकारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी मंगेश चिवटे यांनी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

या महाआरोग्य शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना आरोग्यसेवा मिळाली असून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!