शिरताव ग्रामस्थांचा सामाजिक आदर्श! स्व. रणजीत चव्हाण यांच्या कुटुंबाला ₹१.२९ लाखांची मदत; पत्नीला ग्रामपंचायतीत नोकरी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड /शिरताव –प्रतिनिधी
समाजातील संवेदनशीलतेचा आणि एकतेचा उत्तम नमुना शिरताव (ता. माण) ग्रामस्थांनी दाखवून दिला आहे. ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे स्वर्गीय रणजीत चव्हाण यांच्या आकस्मिक निधनानंतर गावातील नागरिक, ग्रामपंचायत तसेच दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक तसेच शासकीय सहाय्य दिले आहे.
गत महिन्यात जलपुरवठा कामकाजादरम्यान विषारी वायू गळतीमुळे कर्तव्यावर असतानाच रणजीत चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. नेहमी हसतमुख, मदतीस तत्पर आणि मनमिळावू स्वभावाचे रणजीत चव्हाण हे सर्वांच्याच मनात घर करून गेले होते.
या दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ग्रामस्थ एकदिलाने पुढे आले. “शिरताव ग्रामविकास” या नावाने तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी, बाहेरगावातील नागरिकांकडून निधी संकलन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून एकूण ₹१,२९,५००/- इतकी रक्कम जमा झाली.
ही संपूर्ण रक्कम सरपंच हनुमंत हरी विरकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत रणजीत चव्हाण यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने मानवतेचा उत्कृष्ट आदर्श ठेवत त्यांच्या पत्नीला शिपाई म्हणून नोकरी देण्यास मंजुरी दिली आहे.
या वेळी ग्रामस्थांनी भावनिक शब्दांत सांगितले —
“रणजीत चव्हाण यांची सेवा आणि कर्तव्यनिष्ठा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.”
या हृदयस्पर्शी उपक्रमामुळे शिरताव ग्रामपंचायतीचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श संपूर्ण तालुक्यासमोर उभा राहिला आहे.

