व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड म्हसवड शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून, भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या घटना शहरातील विविध भागांमध्ये वारंवार घडत आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून पालिकेने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा,
नागरिकांची बदलती जीवनशैली, राहणीमान यासह अनेक बाबी शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढीस कारणीभूत असून, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून होणारे दुर्लक्ष आणि गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या चारही दिशांना झालेला विस्तार यामुळे नागरिकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावर सर्रास लावले जाणारे चायनीजचे स्टॉल्स, चिकन दुकानें,तसेच हॉटेलमधील अन्नपदार्थ रस्त्यावरच टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी अनेक भटकी कुत्री गोळा होतात. रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानांमध्ये गर्दी करतात. सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक तसेच रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना आठ ते दहा दिवसांनी घडत असतात. रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना तसेच महिला वर्गाला देखील या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चार दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठ,एसटी स्टॅन्ड,शिक्षक कॉलनी,परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली होती. त्या वेळी या भागातील अनेक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण असून अंतर्गत रस्ते, मुख्य रस्तांवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
रस्त्याकडेला उभे करण्यात आलेली वाहने, स्कुलबस, टेम्पो मोकळी मैदाने व कचराकुंड्या येथे भटक्या कुत्र्यांनी आपले हक्काचे ठिकाण केले आहे. रात्री, बे-रात्री, पहाटे ये-जा करणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्लामुळे दशहत निर्माण झाली आहे. दुचाकीमागे भुंकत कुत्री लागल्यामुळे अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पालिकेने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.