व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड:
स्वर्गीय आ.धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मारक अनावरण कार्यक्रमास भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याची माहिती अभय वाघमारे यांनी दिली स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांचे माण तालुक्यातील वडजल या गावी स्मारक उभारण्यात आले असून या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमास क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना अभय वाघमारे यांनी उपस्थित राहण्यासाठी मुंबई येथे भेट घेऊन विनंती केली आहे. अनेकदा विधिलिखित असणाऱ्या गोष्टींना आपण योगायोग म्हणत असतो. परंतु नियती ही तिचे काम आपल्या नकळतसुद्धा अगदी चोखपणे करत असते. माण – फलटणचे स्वर्गीय आमदार धोंडिराम दादा वाघमारे यांनी आमदार व्हायच्या कित्येक वर्षे अगोदर दुष्काळग्रस्त माणदेशाच्या व्यथा आपल्या ‘हुंदका’ या काव्यसंग्रहातून अतिशय उद्बोधकरित्या मांडल्या होत्या.
विशेष म्हणजे १९८३ साली याच काव्यसंग्रहाचे अनावरण भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे वडील व ख्यातनाम साहित्यिक स्वर्गीय रमेशजी तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.आज ४० वर्षानंतर नियती हेच जुने ऋणानुबंध नव्याने जुळवताना दिसत आहे. क्रिकेटच्या जगतातील देव असा लौकिक असलेले सचिन तेंडुलकर व त्याच क्रिकेटच्या माध्यमातून नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स क्लबतर्फे ए डीव्हिजन मध्ये खेळणारे अभय वाघमारे या दोघांचेही वडील हे नामवंत साहित्यिक होते हासुद्धा एक अनोखा योगायोगच आहे.
स्वर्गीय आमदार धोंडीरामदादा वाघमारे यांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्मगावी म्हणजे माण तालुक्यातील वडजल या गावी उभारण्यात येत आहे. सदर स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना विशेष आमंत्रण देण्यात आलेले आहे. वाघमारेदादांचे सुपुत्र श्री. अभय वाघमारे यांची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याशी स्मारकाच्या अनावरणासंदर्भात नुकतीच भेट झाली व त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. आपल्या वडिलांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या धोंडीरामदादा वाघमारे यांच्या स्मारक अनावरण कार्यक्रमास यायला मला नक्की आवडेल असे सचीनजी यांनी यावेळी सांगितले.
माण तालुक्यात विकासाची गंगा आणणाऱ्या धोंडीराम दादा वाघमारे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने भारताचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेल्या सन्माननीय भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे माण तालुक्यात आगमन होणार आहे या बातमीने तालुक्यातील युवावर्गात प्रचंड औत्सुक्य आणि पराकोटीचा आनंद पाहायला मिळत आहे.
स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मारकाचे अनावरण लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय नेते माजी कृषीमंत्री शरद चंद्रजी पवार यांचे हस्ते अनावरण करण्यात येणार असून याप्रसंगी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण भाजपचे आमदार लोकनेते गणेशजी नाईक, माजी उपमुख्यमंत्री मंत्री विजयसिंह मोहिते पाटील,विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार शिवसेनेचे नेते आमदार शहाजी बापू पाटील, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, आमदार भाई जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.