कराड–मसूर राज्य महामार्गावरील कॅनॉललगत रखडलेला मुख्य गटारीचा प्रश्न अखेर मार्गी; शेकडो नागरिकांच्या आरोग्याला दिलासा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कराड: कुलदीप मोहिते

कराड–मसूर राज्य महामार्गालगत सैदापूर परिसरातील कॅनॉलजवळ अनेक वर्षांपासून रखडलेला मुख्य गटारीचा प्रश्न अखेर स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून मार्गी लागला आहे.

या भागातील मुख्य गटार अपूर्ण अवस्थेत असल्याने सांडपाणी रस्त्यावर व आजूबाजूच्या परिसरात साचत होते. त्यामुळे दुर्गंधी, डासांची वाढ आणि अस्वच्छतेमुळे शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत होती. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या ये-जा करण्यास अडचणी येत होत्या, तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत व संबंधित विभागाकडे मागणी केली होती. अखेर पंचायत समिती सदस्या सौ. माधवी नाना पाठसुपे यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला.

या कामात सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य कुमार देसाई, बांधकाम उपअभियंता टोपे तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या समन्वयातून प्रत्यक्ष जागेची पाहणी करून गटारीतील अडथळे दूर करण्यात आले आणि पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती; मात्र आता प्रश्न सुटल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. गटारीचा प्रश्न मार्गी लागल्याने स्वच्छता सुधारेल, डासांचे प्रमाण कमी होईल आणि संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *