कुळाच्या जमिनीचा विषय आमचा आणि शेतकऱ्यांचा; तोडगा फक्त आम्हीच काढू शकतो – अॅड. पृथ्वीराज राजेमाने
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड दि. २२
म्हसवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कुळाच्या जमिनीचा मुद्दा उकरून काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून, हा विषय राजकीय फायद्यासाठी वापरू नये अशी टीका युवा नेते अॅड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने यांनी पत्रकार परिषदेत केली.
नगरपालिकेच्या रणधुमाळीने तापलेले राजकीय वातावरण पाहता मंत्री गोरे यांनी ठोस प्रचाराचा मुद्दा नसल्याने कुळाच्या जमिनीचा विषय अनावश्यकपणे पुढे आणल्याचा आरोप अॅड. राजेमाने यांनी केला. “कुळाच्या जमिनीचा प्रश्न हा राजेमाने कुटुंबीय आणि संबंधित शेतकऱ्यांमध्ये बसून सोडवण्याचा आहे. तो विषय मंत्री महोदयांचा नाही. त्यांनी दाखवलेली कागदपत्रे तज्ज्ञ वकिलांना दाखवा; मी स्वतः वकील आहे, आणि अशा कागदांनी जनतेची फसवणूक करता येणार नाही,” असे ते म्हणाले.
मंत्री गोरे यांनी प्रचारसभेत राजेमाने परिवारावर केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना अॅड. राजेमाने म्हणाले की, “आम्ही आजवर लोकहितार्थ स्वतःच्या जमिनी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी दिल्या आहेत. कोणाची फसवणूक किंवा लुबाडणूक केलेली नाही. मात्र मंत्री महोदयांच्या जमिनीच्या व्यवहारांबाबत जनतेला सर्व माहिती आहे. मायणीतील भिसे प्रकरण असो किंवा लोणावळ्यातील जमिनीचे व्यवहार—हे सर्व लोकांसमोर स्पष्ट आहेत.”
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की कुळाच्या जमिनीचा वाद २००८ पासून न्यायालयात सुरू आहे. “आपण २००९ पासून राजकारणात सक्रिय आहात, पण आजवर आपण कधीही या प्रकरणात लक्ष घातले नाही. निवडणुकीत मुद्दा नसल्यानेच आता हा विषय पुढे आणला जात आहे,” असा घणाघात अॅड. राजेमाने यांनी केला.
राजेमाने कुटुंबीयांनी समाजकारणाची परंपरा जपल्याचे सांगताना त्यांनी आठवण करून दिली की त्यांच्या वडिलांनी—कै. विजयसिंह राजेमाने—स्वतःची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली. “त्या शिक्षण संकुलातून हजारो विद्यार्थी अधिकारी झाले, अनेकांना रोजगार मिळाला. आमच्या जमिनीवर आज जे शेतकरी आहेत, त्यांच्याकडून राजेमाने परिवाराने कधीही एक गवताची काडीही घेतली नाही,” असे ते म्हणाले.
“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार समाजहितासाठी कार्य करतो. कुळाच्या जमिनीचा तोडगा लवकरच निघेल आणि तोही शेतकऱ्यांच्या हिताचा असेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला श्रीमंत तेजसिंह राजेमाने, जयसिंह राजेमाने, अभय जगताप, बाळासाहेब माने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

