“राजमाता अहिल्यादेवींनी दिलेला आदर्श आजही मार्गदर्शक” — मंत्री जयकुमार गोरे यांचे मासाळवाडीत प्रतिपादन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)

म्हसवड (प्रतिनिधी):

“मी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पाईक आहे,” असे गौरवपूर्ण उद्गार ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी मासाळवाडी (ता.माण) येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात काढले.

या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कार्याचा आढावा घेत समाजाला सुशासन, न्यायव्यवस्था आणि पाण्याचे संवर्धन यांचे मोल पटवून दिले. “शिवाजी महाराजांप्रमाणेच अहिल्यादेवींनीही न्याय, धर्म आणि लोकहित यांचा आदर्श ठेवला. आजपासून ३०० वर्षांपूर्वी त्यांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यासारख्या योजनांची अंमलबजावणी केली होती,” असे सांगत त्यांनी सध्याच्या काळात या विचारांची गरज असल्याचे अधोरेखित केले.

मासाळवाडीच्या युवकांनी उभारलेले अहिल्यादेवींचं स्मारक पाहून मंत्री गोरे यांनी खुले कौतुक करत म्हटलं की, “अशा लहान गावात इतकं सुंदर स्मारक उभारणे ही गौरवाची बाब आहे.” यावेळी त्यांनी म्हसवड शहरात उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाच्या कामांना तात्काळ गती देण्याचे आदेशही मुख्याधिकाऱ्यांना दिले.

पुढील वर्षी अहिल्यादेवी जयंती म्हसवडमध्ये भव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्धारही मंत्री गोरे यांनी व्यक्त केला. गावाच्या विकासासाठी डॉ. वसंत मासाळ यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, “मासाळवाडीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तलावातील पाणी कमी झाल्यास तातडीने पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

रस्ते विकासाचे काम लवकरच सुरू करण्याची घोषणा करताना, “एमआयडीसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची बागायती जमीन घेतली जाणार नाही, आणि कोणतीही जमीन घेतलीच गेली तर त्याचा योग्य मोबदला मिळवून दिला जाईल,” असा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला.

या कार्यक्रमाला सौ. सोनियाताई गोरे, माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, डॉ. सचिन माने (मुख्याधिकारी), आप्पासाहेब पुकळे, शशिकांत गायकवाड, विजय धट, कृष्णा मदने, रामभाऊ कोडंलकर, नारायण मासाळ, डॉ. सतीश मासाळ, नागू वीरकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. वसंत मासाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. युवक, महिला, गजी मंडळ व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!