दानशूर श्रीमंत भागोजी शेठ कीर स्मारकाचे लोकार्पण संपन्न रत्नागिरी शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरेला नवे वैभव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

मुंबई प्रतिनिधी : गणेश तळेकर

रत्नागिरी शहराच्या वेशीवरील साळवी स्टॉप परिसरात दानशूर आदरणीय श्रीमंत भागोजी शेठ कीर यांच्या पवित्र स्मारकाचे लोकार्पण सायंकाळी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री यांच्या पुढाकारातून आणि दूरदृष्टीतून उभे राहिलेले हे स्मारक रत्नागिरीच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरत आहे.

यापूर्वीही रत्नागिरी शहराच्या प्रारंभी ‘स्वर्गीय भागोजीशेठ कीर प्रवेशद्वार’ उभारून पालकमंत्र्यांनी सामाजिक जाणिवेचा ठसा उमटवला होता. या स्मारकातून रत्नागिरी व महाराष्ट्रातील भावी पिढ्यांना नवी प्रेरणा, नवा संदेश मिळेल आणि सामाजिक मैत्री व ऋणानुबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

दानशूर भागोजी शेठ कीर यांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून व्यापक समाजहिताचे होते. रत्नागिरीच्या पेठकिल्ला भागातील या सुपुत्राने रत्नागिरी ते मुंबई असा जीवनप्रवास करत असंख्य लोकोपयोगी कार्ये उभी केली. मुंबईपासून काशी-वाराणसी, पंढरपूर ते गाणगापूरपर्यंत धर्मशाळा व भक्तिसंस्था उभारणे, मुंबईत ऐतिहासिक वास्तू साकारणे तसेच रत्नागिरीतील ऐतिहासिक पतितपावन मंदिराची उभारणी ही त्यांच्या समाजसेवेची ठळक उदाहरणे आहेत. याच मंदिरात पुढे यांनी बहुजन समाजबांधवांसाठी सामूहिक भोजन पंगती आयोजित केल्याची ऐतिहासिक नोंद आहे.

या प्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा उल्लेख केला. शिवसृष्टी, तारांगण, आरे-वारेतील संभाव्य प्राणी संग्रहालय, रत्नागिरी विमानतळ पुनर्विकास अशा विकासकामांची साखळी रत्नागिरी शहराच्या प्रगतीची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांकडून एक विधायक सूचना मांडण्यात आली—रत्नागिरीच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या स्मृती जपणारे भव्य ‘रत्नागिरी भवन’ उभारावे. या भवनात अभ्यासिका, स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन, कौशल्य विकास, संशोधन, कला वर्ग व सादरीकरणासाठी स्वतंत्र दालने असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दानशूर श्रीमंत भागोजी शेठ कीर स्मारकाच्या लोकार्पणानिमित्ताने त्यांच्या विचारांचा वसा जपत समाजप्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री उदय सामंत यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *