मौजे नरवणे शिवारात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी (प्रतिनिधी अहमद मुल्ला)
माण तालुक्यातील नरवणे शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात रजि. नं. 42/2025 असा गुन्हा बी.एन.एस.एस. कलम 194 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भागवत बबन शिंदे (वय 50, व्यवसाय शेली, रा. तुळशी, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा तुषार भागवत शिंदे (वय 28, मुळ रा. तुळशी, हल्ली रा. राणद, ता. माण, जि. सातारा) हा दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी घराबाहेर गेला होता.
दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास मौजे नरवणे ता. माण गावाच्या हद्दीतील “डब” नावाच्या शिवारात संजय कोळेकर व इतरांच्या मालकीच्या पडीक जमिनीत असलेल्या ओधळीत तो मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासानुसार मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमॉर्टमची तजवीज ठेवण्यात आली असून घटनेचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस हवालदार एस.एस. वावरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

