म्हसवड परिसरात भीषण अपघात : उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा जागीच मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात शनिवारी रात्री हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना उसाच्या हंगामातील अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या अपघातात सूरज संजय माने (वय २४, रा. म्हसवड) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता, कुकुडवाड–मायणी रस्त्यावर कुकुडवाडपासून सुमारे १.५ कि.मी. अंतरावर हा भीषण अपघात झाला.
सूरज माने हे आपल्या TVS Iqube (क्र. MH 11 DS 1806) या इलेक्ट्रिक दुचाकीवरून खटाव–माण अ‍ॅग्रो शुगर फॅक्टरी, पडळ येथे ड्युटीसाठी जात होते.♦

त्यांच्या पुढे भारत विठ्ठल शिंदे (रा. ढाकणी, ता. माण) हा Massey Ferguson कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 11 BZ 1360) घेऊन दोन उसाने भरलेल्या ट्रॉलींसह जात होता. चालकाने वाहनावर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणे वेगात ट्रॅक्टर चालविल्याने ट्रॉली जोडणारी पिन अचानक तुटली.

यामुळे मागील दोन्ही उसाने भरलेल्या ट्रॉली रस्त्यावर घसरत आल्या आणि मागून येणाऱ्या सूरज माने यांच्या दुचाकीवर आदळल्या. जोरदार धडकेत सूरज माने हे ट्रॉलीखाली दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चालकाने जखमी तरुणाला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मृतकाचा भाऊ धीरज संजय माने (वय ३३, रा. म्हसवड) यांनी ११ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १.३७ वाजता येथे तक्रार दाखल केली असून घटनेचा अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. खाडे करत आहेत

या घटनेमुळे संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. उसाच्या हंगामात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ट्रॅक्टर–ट्रॉलींच्या वाहतुकीवर कडक नियंत्रण व सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे राबवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
एका निष्पाप तरुणाचा जीव गेलेला असताना प्रशासन आणि वाहनचालकांनी तरी आता जागे व्हावे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *