तहसीलदार विजय पवार यांनी केली शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी – “सेवेतून सन्मान, सन्मानातून प्रेरणा”
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड प्रतिनिधी
दिवाळीचा सण हा प्रकाश, आनंद आणि आपुलकीचा. पण या प्रकाशोत्सवाच्या तेजात काही घरं अशी असतात जिथे दिवे लागतात, पण मुलगा नसतो… वडील नसतात… कारण त्यांनी देशासाठी बलिदान दिलं असतं. अशा या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची दिवाळी गेल्या चार वर्षांपासून उजळविण्याचं काम कराड तालुक्यातील माजी तहसीलदार विजय पवार सातत्याने करत आहेत.
कारगिल युद्धातील शहीद सैनिक महादेव निकम, शहीद नायब सुभेदार शंकर उकलीकर, शहीद सचिन बावडेकर, शहीद हवालदार सोमनाथ सुर्वे अशा अनेक वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या घरी तहसीलदार विजय पवार स्वतः जाऊन भेट देतात.
त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करून दिवाळी फराळ, नवीन कपडे आणि आर्थिक मदत देत ते या वीर मातां–पत्नींना आदराचा मान देतात.
ही केवळ भेट नव्हे, तर “शहिदांच्या कुटुंबीयांसाठी प्रशासनही आपलेच आहे” हा भाव त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे.
कराड तहसील कार्यालयात कार्यरत असताना विजय पवार यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार ‘अमृत वीर जवान अभियान’ सुरू केले.
त्याचबरोबर त्यांनी “सैनिक कक्ष” स्थापन करून दर महिन्याला ‘सैनिक दरबार’ आयोजित केले, ज्यामध्ये आजी/माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली.
त्यामुळे कराड तालुका “सैनिकांच्या समस्या तत्काळ सोडविणारा तालुका” म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात प्रसिद्ध झाला.
सैनिकांच्या सेवेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते “सैनिक समाज यशवंत पुरस्कार” विजय पवार यांना कराड येथे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट व सैनिक फेडरेशन यांच्या वतीने देण्यात आला होता.
कराड तालुक्यातील अनेक शहीद सैनिकांच्या अंत्यविधी, श्रद्धांजली कार्यक्रम आणि शहीद दिवस साजरे करण्यामध्ये पवार यांची उपस्थिती कायम राहिली आहे.
त्यांनी “शहीद सैनिक हा देशाचा खरा हिरा आहे” या भावनेने प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला.
त्यामुळे आज कराड तालुक्यातील सैनिक व शहीद कुटुंबीयांच्या हृदयात विजय पवार हे तारणहार प्रशासनिक अधिकारी म्हणून ओळखले जातात.
या उपक्रमावेळी माजी सैनिक प्रशांत कदम (राज्य उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन), नि. सुभेदार सुर्वे साहेब, तसेच माजी सैनिक विजय पाटील उपस्थित होते. सर्वांनी तहसीलदार पवार यांच्या या सातत्यपूर्ण कार्याचे मनापासून कौतुक केले.
“देशासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबाचा सन्मान म्हणजेच राष्ट्रसेवा.”
हे वाक्य जणू विजय पवार यांच्या कार्यातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळते.
त्यांच्या या उपक्रमाने दिवाळीचा प्रकाश केवळ घरातच नव्हे, तर सैनिकांच्या हृदयातही उजळला आहे.

