बुद्धिमत्तेतून शिक्षकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी…. अजित काटकर
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड…प्रतिनिधी
बलशाली भारतासाठी विद्यार्थी घडवताना शिक्षक सर्व गुणसंपन्न असला पाहिजे याबरोबरच शिक्षकांनी ज्ञानदूताचे काम करून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे असे आवाहन थोर साहित्यिक अजित काटकर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल मध्ये क्रांतिवीर प्रबोधनी आयोजित शिक्षक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून थोर साहित्यिक अजित काटकर त्यांच्यासह संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे व विन्सेंट जॉन, मुख्याध्यापक अनिल कुमार माने व पूनम जाधव, समन्वयक अभिजीत सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अजित काटकर म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील क्रांतिवीर प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन शिबिर हा शिक्षण क्षेत्र साठी दिशादर्शक उपक्रम आहे. विद्यार्थ्याचे मन, मनगट,मेंदू सक्षम करण्याचे काम शिक्षक करीत असतो त्यातूनच सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडत असतो. बलशाली भारताचा आधार असणारा सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी तेवढाच सक्षम शिक्षक सुद्धा गरजेचा आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे अन त्यातून गुरगुरणारा विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करीत असल्याचे अजित काटकर यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना अजित काटकर म्हणाले जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. विद्यार्थी जीवनाला पैलू पाडण्याचे काम करा. तुम्ही ज्ञान घेतल्याशिवाय देता येणार नाही म्हणून वाचनाची आवड जोपासा. स्वतःची तयारी करूनच विद्यार्थ्यापुढे अध्यापनासाठी जावा. योग्य शैक्षणिक साहित्याचा वापर करा. शिक्षकाचे वागणं बोलणं चालणं समाज हिताचे असले पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच यापुढे शिक्षण हे सुद्धा मूलभूत गरज असल्याचे काटकर यांनी स्पष्ट केले.


