म्हसवडच्या सिद्धनाथ मंदिरातील स्वयंभू शिवलिंग महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
दिलीप कीर्तने
म्हसवड (प्रतिनिधी)
म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरातील भुयारातील स्वयंभू शिवलिंग यंदाच्या महाशिवरात्रीच्या रात्री (दि. २६ फेब्रुवारी) भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दरवर्षी फक्त या पवित्र दिवशीच हे भुयार दर्शनासाठी उघडले जाते. सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन वैभव गुरव, उपाध्यक्ष रविकिरण गुरव आणि सचिव दिलीप कीर्तने यांनी ही माहिती दिली.

सिद्धनाथ मंदिर म्हसवडकरांसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातील भुयारात स्वयंभू शिवलिंग आहे, जे काशी विश्वेश्वराच्या काळभैरव रूपाशी संबंधित मानले जाते. लोकश्रुतीनुसार, शिव आणि विष्णू यांच्या श्रेष्ठत्वाच्या वादातून शिवाने क्रोधित होऊन आपल्या भूजदंडातून महाकाळ म्हणजेच काळभैरवाची उत्पत्ती केली. त्याच वेळी शिवलिंग रूपात म्हसवडच्या भुयारात स्वयंभू स्वरूपात प्रकट झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

भुयाराचे प्रवेशद्वार मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या बाजूला असून त्यावर छोट्या पलंगावर पंचधातूच्या सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. विशेष म्हणजे गाभाऱ्यातील मूर्तींना दररोज पंचामृताने अभिषेक केल्यावर त्याचे थेंब थेट भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर पडतात. हे पुरातत्त्वीयदृष्ट्या तसेच वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून अनोखे आहे.
यंदा भाविकांच्या सुविधेसाठी नव्या पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे दर्शनाची सोय अधिक सुकर होणार आहे. मात्र, भुयारातील मार्ग अरुंद असल्याने एकावेळी फक्त ८-१० भाविकांना दर्शनाची संधी मिळणार आहे.
भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. दर्शन रात्री १० वाजल्यापासून पहाटे ५ पर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान, १० वर्षांखालील मुले, गरोदर महिला, हृदयविकार, बीपी, दमा असणाऱ्या व्यक्तींनी भुयारात जाण्याऐवजी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य आयोजन
महाशिवरात्रीच्या दिवशी पारंपरिक जलाभिषेक, पंचामृत अभिषेक आणि दहिभात पूजन करून स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येतात. या काळात मंदिर परिसर यात्रेचे स्वरूप धारण करतो.
भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे व पोलिस व स्वयंसेवकांचे सहकार्य करावे, असे आवाहन म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय सखाराम बिराजदार यांनी केले आहे