गोंदवले खुर्द येथील सुरज सुनील शीलवंत यांना सावकारकीच्या त्रासातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या फरार आरोपींना अखेर दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात दहिवडी पोलीस ठाणे रजिस्टर नंबर 317/2024 नुसार, IPC 306, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि सावकारकी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिलवंत यांच्या आत्महत्येमुळे सदर आरोपींना अटक करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही आरोपी फरार होते, त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते.
तपासादरम्यान, आरोपी संजय शेडगे आणि आदर्श कट्टे हे अनुक्रमे मध्य प्रदेशातील इंदोर आणि राजस्थानच्या बॉर्डरवर असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे खबऱ्यांच्या मदतीने आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपींना यशस्वीरित्या अटक करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार रामचंद्र आप्पासो तांबे, पोलीस हवालदार रविंद्र बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश पिराजी पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.