दु:खात आधार – सोलापूरच्या पीडित कुटुंबांना ५ लाखांची आर्थिक मदत वितरित
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सोलापूर, प्रतिनिधी:
जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन निरागस जीव गमावले गेलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे.
आज या दुःखद घटनेतील पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या मदतीचे धनादेश संबंधित कुटुंबांना देण्यात आले असून, सरकारने दिलेला शब्द प्रत्यक्षात पाळल्याचे चित्र या प्रसंगी पाहायला मिळाले.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,
> “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित निर्णय घेत दुःखद प्रसंगात आधार देण्याचे काम केले. ही मदत कदाचित त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकणार नाही, पण सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवणारे हे एक पाऊल आहे.”
या मदत वितरण कार्यक्रमास स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, जनप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेनंतर प्रशासनाने जलपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
पीडित कुटुंबांना दिलासा देणारी ही मदत म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक मानली जात असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.