मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे कराडच्या सुनील चौगुले यांना नवे जीवन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते | कराड

कराड येथील सुनील चौगुले यांना मुंबईतील प्रवासादरम्यान छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. त्यांच्या जावयाने, रोहित भोसले यांनी तत्काळ कराड येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. नरेश मोरे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, डॉ. मोरे यांनी त्यांना तातडीने ठाण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला.

चौगुले यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, त्यांना तातडीने एंजिओप्लास्टी करण्याची गरज असल्याचे निष्पन्न झाले. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे उपचार शक्य होईल का, अशी चिंता चौगुले यांच्या कुटुंबीयांना सतावत होती.

यावेळी डॉ. नरेश मोरे यांनी चौगुले यांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीसाठी विनंती केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने एक लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. यासोबतच सिद्धिविनायक ट्रस्टनेही पंचवीस हजार रुपयांची मदत केली. एकूण १.२५ लाख रुपयांच्या मदतीमुळे उपचार खर्चाचा मोठा भार हलका झाला आणि चौगुले यांच्यावर यशस्वीरित्या एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली.

या मदतीमुळे वेळेवर उपचार मिळाल्याने सुनील चौगुले यांचे प्राण वाचले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच डॉ. नरेश मोरे आणि हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजूंसाठी आधार

मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा नैसर्गिक आपत्ती, अपघात तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत पुरविण्यासाठी कार्यरत आहे. या निधीमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळत असून, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तो एक मोठा आधार ठरत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!