‘निर्मिती संवाद’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भरघोस प्रतिसाद

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई
कथा हा चित्रपटाचा आधारस्तंभ असतो. तो भक्कम हवा. फक्त पैसे आहेत, म्हणून निर्माते होऊ नका. चित्रपट माध्यमाचा आणि व्यवसायाचा अभ्यास करा.” असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांनी राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना दिला. ‘मेघराज राजेभोसले फाऊंडेशन’ आयोजित मराठी चित्रपट निर्मात्यांसाठीच्या ‘निर्मिती संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या संकुलात नुकतेच पार पडलेल्या या कार्यशाळेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ४०० हून अधिक चित्रपट निर्मात्यांचा यात सहभाग होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, संकलक, वितरक, थिएटर मालक, वाहिन्यांचे कार्यकारी अधिकारी, ओटीटी तज्ञ अशा अनेक विषयतज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, ‘सिनेमा फ्लाॅप होत नाही, तुमचे बजेट फ्लाॅप झालेले असते. बजेटवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. शासनानेही निर्मात्यांना आर्थिक साह्य देण्याबरोबर इतरही बाबींसाठी मदत करावी.’ तेजस्विनी पंडित म्हणाल्या, ‘निर्मात्यांनी समूहनिर्मितीचा प्रयोग करावा ग्लॅमर नाही, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मराठी चित्रपट पुढारलेले नाहीत आणि लार्जर देन लाईफ असे मराठीत काही नसते, या सर्व आक्षेपांना उत्तरं देणे शक्य होईल.’

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनीही या कार्यशाळेत विचार मांडले. कथेच्या निवडीपासून ते चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांसह शासकीय अनुदान, टिव्ही चॅनल्स, ओटीटी आणि विविध हक्क विक्रीसंबंधी वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा झाल्या.

राज काझी यांनी विषयवार आरेखन केलेल्या या कार्यशाळेत सुनील सुकथनकर, किरण यज्ञोपवित, कांचन अधिकारी, शशांक शेंडे, संजय ठुबे, नीलेश नवलाखा, उपेंद्र सिधये, सुरेश देशमाने, राहुल रानडे, संजय दावरा, युगंधर देशपांडे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर, गणेश गारगोटे, फिल्मसिटीचे पंकज चव्हाण, हेमंत गुजराती, संतोष रासकर, किरण रोंगे, गिरीश जांभळीकर, अन्वय कोल्हटकर, शौकत पठाण, शाम मळेकर, सुरेश तळेकर, आदित्य देशमुख, योजना भवाळकर-भावे आदी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊस आणि उर्विता प्रॉडक्शन्स यांचे सहकार्य या उपक्रमास लाभले होते.

चित्रपट निर्मितीला सहकार्याची शासनाची भूमिका
या कार्यशाळेत उपस्थित गोरेगाव फिल्मसिटीचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण यांनी शासनाचे चित्रपटविषयक धोरण स्पष्ट केले. शासनाच्या अनुदान योजनेतील विविध सुधारणा आणि याशिवायच्या विविध साह्यकारी योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. एक खिडकी योजना सुरू असून, निर्मात्यांनी त्याचा लाभ घ्यावा, कलासेतू पोर्टलला भेट द्यावी, असेही ते म्हणाले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!