म्हसवड नगरपालिकेची कठोर कारवाई – अवैध बांधकामांवर बुलडोझरचा घणाघात!
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड:
शहराच्या सुव्यवस्थेसाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हसवड नगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद हद्दीतील अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवत अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता, त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या कारवाईकडे लागले होते.

बेकायदेशीर धर्मस्थळावर कारवाई
शहरातील एका भागात परवानगीशिवाय बांधकाम करून त्याचे धर्मस्थळात रूपांतर करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या होत्या. यासंदर्भात मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी स्वतः पाहणी करून संबंधित बांधकाम मालकाला नोटीस बजावली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने बुलडोझरच्या सहाय्याने हे अवैध बांधकाम जमीनदोस्त केले.

लोहार कुटुंबियांचे घरही जमीनदोस्त
शहरातील सिद्धनाथ विद्यालयाजवळ सुरू असलेल्या विकासकामांस अडथळा ठरणारे लोहार कुटुंबीयांचे घरही पाडण्यात आले. पालिकेने त्यांना आधीच नोटीस दिली होती, मात्र घर स्वमालकीचे असल्याचा दावा करत त्यांनी आठ दिवसांपासून पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात त्यांच्या घरावरही कारवाई केली.
पालिकेच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया
या कठोर कारवाईमुळे नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पालिकेच्या नियमबद्ध अंमलबजावणीचे स्वागत केले, तर काहींनी सामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर कारवाई होत असताना बड्या व्यक्तींना अभय दिले जात असल्याचा आरोप केला.
मुख्याधिकारींचा स्पष्ट संदेश – अतिक्रमण हटवा अन्यथा कठोर कारवाई!


