व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
उंब्रज :प्रतिनिधी श्रीकांत जाधव
उंब्रज येथे नवरात्र उत्सवाच्या काळात गाडी आडवी लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात हाणामारी झाल्याने पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, उंब्रज पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
फिर्यादी संतोष भरत कमाने (वय २९, व्यवसाय मजूर, रा. आण्णाभाऊ साठेनगर, उंब्रज) आणि विशाल काळे (रा. उंब्रज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता उंब्रज बाजारपेठेतील एम.के. पानशॉपसमोर गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून हाणामारी झाली.
सदर घटनेत आरोपी विशाल चंदू काळे, संकेत संतोष चव्हाण, बाबु मोहन चव्हाण, धीरज गुलाब आटोळे, आणि दशरथ कुबेर जावळे (सर्व रा. उंब्रज, ता. कराड) यांच्यावर परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उंब्रज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. भोरे यांनी त्यांच्या स्टाफला तात्काळ सूचना देऊन सर्व आरोपींना अटक करण्यात आली. प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गडबड खपवून घेतली जाणार नाही. सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.