खटाव-माण मधील चारा छावणीचे रखडलेले अनुदान मिळणार रणजितसिंह देशमुख यांच्या लढ्याला यश
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी)-
कायम दुष्काळी असणाऱ्या खटाव -माण तालुक्यात २०१८ साली जनावरांच्या चारा छावण्या उभारल्या होत्या. त्याचे अनुदान रखडल्याने शासनाकडे रणजीतसिंह देशमुखांनी आंदोलने करून पाठपुरावा केला होता. या लढ्याला अखेर यश आले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या प्रयत्नातून अनुदान प्राप्त झाल्याने दोन्ही तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
सन २०१८ साली खरीप हंगामात दुष्काळजन्य पारिस्थिती निर्माण झाली होती. शासनाने या दरम्यान दुष्काळ जाहीर केला. सातारा जिल्ह्यातील माण , खटाव तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. खटाव माण – तालुक्यातील विविध सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांची जनावरे जगली पाहिजेत या उदात्त हेतूने चारा छावण्या उभ्या केल्या. संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयाचे भाग भांडवल गुंतवले होते. दरम्यान वेळेत अनुदान न मिळून देखील चारा छावण्या व्यवस्थीतरित्या सुरु होत्या.
माण , खटाव तालुक्यातील एप्रिल ते ऑगस्ट २०१९ या कालावधीतील ५ कोटी ३५ लाख २८ हजार ७२८ रुपये इतके अनुदान प्रलंबीत होते. हे अनुदान लांबणीवर पडत असल्याने चारा छावणी धारकांच्यात असंतोष निर्माण झाला होता. देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला होता.
मात्र दुष्काळी भागाला आंदोलना शिवाय काहीही मिळत नाही याची प्रचिती यानिमित्ताने आली. चारा छावणी धारक व शेतकऱ्यांना सोबत घेऊन देशमुखांनी विविध प्रकारे आंदोलने केली होती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन थकीत अनुदाना बाबत लेखी पत्रही दिले होते तर माजी मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत विधान परिषदेत आवाज उठवला होता. याला विभागीय आयुक्त , पुणे यांच्या कार्यालयाकडून थकीत चारा छावणी अनुदान निधी वितरीत करण्याचे आदेश सोमवार दि. ७ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले. यामुळे खटाव माण तालुक्यातील चारा छावणी धारकांच्यातुन समाधान व्यक्त होत आहे.
थकीत चारा छावणी अनुदानासाठी उभारलेल्या लढ्याला व पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले. या सदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री महादेव जानकर आणि आखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य रणजीतसिंह देशमुख यांचे खटाव – माण तालुक्यातील शेतकरी व चार छावणी धारकांच्यातून अभिनंदन होत आहे.