भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माण तालुक्यातील जनतेचा विधायक उपक्रम
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, माण तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दहिवडी आणि म्हसवड शहरात करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थितांना समाजसेवेच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
“रक्तदान हे जीवनदान आहे”, असे सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले. या शिबिरामध्ये माण तालुक्यातील सर्व गावांतील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आणि म्हसवड, दहिवडी शहरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब, गरजू आणि वंचितांच्या सेवेसाठी दिलेले योगदान आणि त्यांची लोककल्याणकारी कार्यपद्धती यांना समर्पित भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराद्वारे संकलित झालेले रक्त स्थानिक रुग्णालये व गरजूंना नवजीवन देण्यासाठी वापरले जाणार आहे.
या वेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन करणाऱ्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पत्रकार बांधव यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.