नागठाणे येथे महिला दिनानिमित्त आध्यात्मिक ध्यान कार्यक्रम उत्साहात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कराड : कुलदीप मोहिते

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागठाणे येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक ध्यान व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांना आध्यात्मिकतेचे महत्त्व पटवून देत सकारात्मक विचारांच्या माध्यमातून जीवनात प्रगती साधता येते, असा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात ब्रह्मकुमारी सेंटरच्या संचालिका डॉ. सुवर्णा दीदी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आध्यात्मिक ध्यान व सकारात्मक विचार यांच्या साहाय्याने कोणतीही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकते. मनाची शांती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ध्यान हा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अजित साळुंखे (झेडपी सदस्य, नागठाणे विभाग) व संतोष साळुंखे (पंचायत समिती सदस्य, नागठाणे विभाग) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. क्षेत्र कोणतेही असो, शांतता, संयम आणि धैर्य या गुणांमुळेच माणूस यशस्वी होतो. त्यासाठी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

एपीआय प्रशांत हुले (बोरगाव पोलीस स्टेशन) यांनी सांगितले की, समाजात शांतता प्रस्थापित करायची असेल आणि गुन्हेगारी कमी करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक जीवन जगणे गरजेचे आहे. अध्यात्मामुळे माणसाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते आणि तो योग्य मार्गाने जीवन जगू शकतो. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवव्याख्याते गणेश लुबाळे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माता जिजाऊ, तसेच अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांसारख्या महान स्त्रियांचे समाजातील योगदान अधोरेखित केले. महिलांनी समाज घडवण्यात दिलेले योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी हिंदूराष्ट्र सेना कराडचे अध्यक्ष पांडुरंग डोलारे यांनी सांगितले की, आजच्या काळात राजयोगाच्या माध्यमातून मानवजातीच्या सुख-समाधानासाठी डॉ. सुवर्णा दीदी यांसारख्या तपस्वी व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असून हे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला पत्रकार अनिल मोरे यांच्यासह अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *