हरवलेल्या महिलांच्या शोधासाठी राज्यात स्पेशल सेल; वर्षभरात शोध लागलेल्या महिलांमध्ये १०% वाढ – मुख्यमंत्री फडणवीस
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
मुंबई, :
राज्यात हरवलेल्या महिलांचा शोध अधिक वेगाने आणि प्रभावीपणे घेण्यासाठी राज्य शासनाने विशेष ‘स्पेशल सेल’ स्थापन केला असून या सेलमुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांच्या संख्येत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या विशेष सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी राज्यभरातील हरवलेल्या महिलांच्या शोध मोहिमांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी यावर देखरेख ठेवतात.
या सेलच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नियमित बैठका घेऊन शोधमोहीमांची प्रगती तपासली जाते. तसेच राज्यभरात विशेष शोध मोहिमा राबविण्यात येतात. पहिल्या वर्षात साधारणतः ५५ ते ६० टक्के महिलांचा शोध लागतो, तर अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत हा आकडा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. शासनाचे उद्दिष्ट हा दर ९५ ते ९६ टक्क्यांपर्यंत नेण्याचे असून तोपर्यंत प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हरविलेल्या मुला-मुलींच्या शोधासाठी राज्यात जुलै २०१५ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ‘ऑपरेशन मुस्कान’च्या १३ मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांद्वारे ४१ हजार १९३ बालकांचा शोध घेण्यात यश आले आहे.
सध्या २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ मोहीम सुरू असून १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ४५४ मुले आणि ९४७ मुली अशी एकूण १,४०१ बालके शोधण्यात आली आहेत. तसेच हरविलेल्या महिला व बालकांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीमही राज्यभर राबविण्यात येत आहे.
महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना, पोलिसांची गस्त वाढविणे, ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असून सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

