प्रतिबंधित अन्नपदार्थांबाबत विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
मुंबई, :
संपूर्ण राज्यात २० ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थांबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान संपूर्ण राज्यात एकूण २२० ठिकाणी कारवाई करण्यात आली असून तीन वाहने जप्त केली आहेत. याशिवाय १८० आस्थापना सील करून एकूण २९ लाख ६६ हजार ९२८ रुपयांचा साठा जप्त करून या सर्व प्रकरणी पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण २२२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एप्रिल २०२३ पासून २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने राज्यात एकूण ६७६ ठिकाणी कारवाई करून ९५ वाहने जप्त केली असून ४१३ आस्थापना सीलबंद केल्या आहेत. तसेच एकूण १७ कोटी ६४ लाख ७४ हजार ६७४ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सर्वप्रकरणी पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण ७०९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईचे स्वरूप व व्याप्ती मोठी आहे. संपूर्ण राज्यात जुलै २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी, सुगंधीत तंबाखू व तत्सम पदार्थाच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून) व विक्रीस जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंध घालण्यात येत आहे. त्यानुसार, २० जुलै २०२३ पासून या अन्न पदार्थावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
या अन्न पदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये व महाराष्ट्र राज्यातून व विक्रीस प्रतिबंध असला तरीही काही असामाजिक तत्वे चोरीछुपे मार्गाने सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या विक्रीचा व्यवसाय आर्थिक लाभाच्या हेतूने करत असतात. या असामाजिक तत्त्वावर आळा बसावा तसेच बंदी आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन सदैव तत्पर असून सदर प्रतिबंधित पदार्थाचा अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ व नियम, २०११ नुसार निरंतर कारवाई करण्यात येत आहे.