म्हसळा पोलिसांची मोठी कारवाई: मांदाटणे येथील घरफोडीचा छडा लावला, एक आरोपी जेरबंद!
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालुक्यातील मौजे मांदाटणे येथील एका फार्म हाऊसवर झालेल्या घरफोडीचा म्हसळा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास लावत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की डोंबिवली (पूर्व) येथील रहिवासी ईशान वेदप्रकाश यादव यांच्या मांदाटणे येथील फार्म हाऊसवर ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील सोफा सेट, गॅस सिलेंडर, शेगडी, इन्व्हर्टर, बॅटरी, गिझर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अगदी किचनमधील स्टीलच्या भांड्यांवरही डल्ला मारला होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी संशयावरून आफताब अन्वर खोपटकर (वय २६, रा. पांगलोली, ता. म्हसळा) याला अटक केली. त्याच्याकडून २८,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील त्याचा साथीदार रिजवान सरखोत हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र पारखे, पो.उप.नि. एडवळे, पो.ह. सुर्वे, पो.शि. चितारे, पवार, मुल्ला आणि पुरी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

