डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी SIT चौकशीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं मुख्यमंत्री फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहोते
सातारा :प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे.
या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन सादर करण्यात आले.
या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही पोलीस अधिकारी व राजकीय व्यक्तींवर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच त्यांच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी राजकीय दबाव आणल्याचा आरोप केल्याने प्रकरण अधिकच गडद झालं आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सातारा जिल्हा यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांना ईमेलद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत
* विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी.
* दोषी ठरलेल्या पोलीस अधिकारी व राजकीय व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.
* प्रकरणाचा निकाल जलदगती न्यायालयात (Fast Track Court) देण्यात यावा.
* पीडित कुटुंबाला संरक्षण व न्याय मिळावा, याची शासनाने खात्री करावी.
या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे यांनी सही केली असून त्यांनी म्हटलं आहे की,
“डॉ. मुंडे यांच्या मृत्यूमागे अनेक गंभीर प्रश्न आहेत. सत्य बाहेर यावे आणि दोषींना शिक्षा मिळावी, यासाठी निष्पक्ष SIT चौकशी होणं अत्यावश्यक आहे.”
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सेनेने केली आहे.

