सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे उत्साहात दिंडी सोहळा संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज चॅनल
म्हसवड | प्रतिनिधी
फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे शालेय उपक्रमांतर्गत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या पारंपरिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिकतेसोबतच सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक होत असल्याचे या वेळी प्रकर्षाने जाणवले.
कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली. प्राध्यापक नितीन राऊत, प्राध्यापक विठ्ठल गेजगे आणि निलेश सरतापे यांनी साजेस्या अभंग गायकांनी सोहळ्याची सुरुवात केली. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांनी परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती. भगवी वस्त्रे, टाळ-मृदंग, डोक्यावर तुळशीमाळ घालून, हातात झेंडा घेऊन सहभागी झालेले हे विद्यार्थी सारेच लक्षवेधी ठरले. रिंगणाच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे सजीव दर्शन घडले. टाळ, मृदंग आणि फुगडीच्या नादात संपूर्ण म्हसवड परिसर भक्तिभावात रंगून गेला.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले पारंपरिक नृत्य, फुगडी आणि रिंगण. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्याचे योगदान आणि संस्कृती यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. पी.यू. दासरे, उपमुख्याध्यापक पी.के. यादव, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या पटांगणात आणि परिसरात आनंदमय, भक्तिमय आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले.
शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून शाळेचे कौतुक करण्यात येत आहे.
वारकरी संप्रदायाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा आणि संस्कृतीची जाण देणारा असा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली.