श्री सिद्धनाथ–माता जोगेश्वरी शाही विवाह सोहळा प्रारंभ घटस्थापना, नवरात्रारंभ व हळदी समारंभ भक्तिरसात संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी – दिलीपराज कीर्तने)
माण तालुक्याचे आराध्य दैवत श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या नवरात्र महोत्सवाला यावर्षी बुधवार दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पारंपारिक विधीपूर्वक भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे ५.४५ वाजता घटस्थापना करण्यात आली, तर दुपारी १०.३० ते ३.०० दरम्यान श्रींचा हळदी समारंभ उत्साहात संपन्न झाला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक म्हसवड येथे श्री सिद्धनाथ–माता जोगेश्वरींच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. मुख्य पुजारी व सालकरी यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने नवरात्राची सुरुवात करण्यात आली. या १२ दिवसांच्या उपवासकाळात गुरव समाज, मानकरी व हजारो भक्त ‘उभे नवरात्र’ पाळत अखंड उपासना करतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आजही निष्ठेने सुरू आहे.

* दिवाळी मैदानाचा सोहळा तब्बल २५ तास चालला!
गुरुवार दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता सुरू झालेल्या दिवाळी मैदानाच्या कार्यक्रमाचा समारोप शुक्रवारी दुपारी पाच वाजता झाला. फटाक्यांची आतषबाजी, पारंपारिक पोशाखातील मिरवणुका आणि ढोल-ताशांच्या गजरात भक्तांनी उत्सवाचा आनंद घेतला. म्हसवड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
तुळशी विवाह व श्रींचा शाही विवाह – रविवार, २ नोव्हेंबर
या दिवशी पहाटे ६ वाजता घट उटवले जातील, आणि मध्यरात्री १२ वाजता श्री सिद्धनाथ–माता जोगेश्वरींचा शाही विवाह सोहळा पारंपारिक विधीपूर्वक पार पडेल.
मंदिराच्या हत्तीशिल्प मंडपातून अंबारीत श्रींची मूर्ती गाभार्यात नेण्याचा क्षण भक्तांसाठी अत्यंत भावविव्हल करणारा असतो. श्रींच्या मूर्तीस स्पर्श झाला की वर्षभर सुख-समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे.
काळभैरव अष्टमी – बुधवार, १२ नोव्हेंबर
या दिवशी रात्री ९ वाजता श्री काळभैरव पूजन व विशेष आरतीचा कार्यक्रम होणार असून, म्हसवडमध्ये भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

रथोत्सवाने होणार सांगता – शुक्रवार, २१ नोव्हेंबर
दुपारी १.३० वाजता देवदिवाळी निमित्त श्री सिद्धनाथ–माता जोगेश्वरींची भव्य रथयात्रा निघणार आहे. या दिवशी सहा ते सात लाख भाविकांची उपस्थिती राहते. संपूर्ण म्हसवड नगरी “श्री सिद्धनाथ–माता जोगेश्वरी च्या नावानं चांगभलं!” या जयघोषांनी दुमदुमून जाते आणि गुलालाच्या लाल रंगाने आसमंत उजळून निघतो.
परंपरेचा तेजस्वी वारसा
गुरव समाज, सेवेकरी व सालकरी यांच्या अखंड निष्ठेमुळे ही परंपरा आजही तेजाने झळकत आहे. महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांसाठी हे देवस्थान जागृत श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.

