व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड (ता. माण, जि. सातारा) – सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पुन्हा एकदा वाळू माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. मानगंगा नदीच्या पात्रातून चोरीछुपे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या डंपरसह आरोपीला अटक करण्यात आली असून, एकूण २५ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
घटनेची सविस्तर हकीकत अशी आहे की, म्हसवड पोलीस ठाण्याला खात्रीशीर माहिती मिळाली होती की, मानगंगा नदीच्या पात्रातून एक पिवळ्या रंगाचा डंपर भरलेली वाळू घेऊन चोरीछुपे वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्वरित पथक तयार करून संबंधित डंपरचा शोध सुरू केला.
या पथकाने म्हसवड, शिरताव, पुळकोटी व आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान बनगरवाडी गावाजवळील पुलाजवळ डंपर दिसून आला. पोलिसांनी पाठलाग करून डंपर थांबवला असता, त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली आढळून आली. डंपरचालकाकडे कोणतेही कायदेशीर परवाने नसल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी सोमनाथ आप्पा तोरणे (वय ३२, रा. कुकुडवाड, ता. माण, जि. सातारा) याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर आणि वाळू असा एकूण २५ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस कर्मचारी जगन्नाथ लुबाळ, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, होमगार्ड अजित शेळके, अक्षय गायकवाड आणि पोलीस मित्र सुमित बोडरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.
या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात अशा प्रकारांवर अजून कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.