महिलांच्या दमदार भूमिकेतून रंगमंचावर शिवचरित्र साकार – ‘शिवप्रताप’ने जिंकली रसिकांची मने
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर
कल्याण महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची राजकीय धावपळ सुरू असतानाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयांवर आधारित ‘शिवप्रताप’ हे भव्य नाटक, कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्य मंदिरात रंगमंचावर सादर झाले. विशेष म्हणजे, या नाटकात ४५ गृहिणींनी सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि बालगोपाळांसह प्रेक्षकांची मने जिंकली.
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता सादर झालेल्या या नाट्यमंचनाने प्रेक्षकांवर शिवकालीन इतिहासाची अमिट छाप सोडली. शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेसाठीची त्यांची धडपड, आणि त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला दिलेली दिशा, या सर्व गोष्टी महिलांच्या प्रभावी अभिनयातून साकारण्यात आल्या.
या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक प्रवीण राणे आणि श्रुती परब यांनी सांगितले की, “आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा, म्हणून या नाटकाची संकल्पना साकार केली. अशा शोचे आयोजन राज्यभर व्हावे, यासाठी आम्ही आवाहन करत आहोत.”
प्रेक्षकांनी नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. लहान मुलांपासून पालकांपर्यंत सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थितांनी नाटकातील कलाकारांच्या सादरीकरणाची जोरदार दाद दिली.
‘शिवप्रताप’सारख्या नाट्यमंचनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आठवण प्रत्येक पिढीला करून दिली जात आहे. अशा उपक्रमांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास प्रेक्षकांनी व्यक्त केला.