शिवसेनेचा दमदार घोष — “युतीचा आदेश आला तर साथ, अन्यथा स्वबळावर लढू; नगरपरिषद ही आम्ही जिंकूनच दाखवू”

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:-प्रतिनिधी
     म्हसवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची भव्य बैठक म्हसवड येथे पार पडली. या बैठकीत उमेदवारांची चाचणी, संघटनात्मक नियोजन आणि निवडणुकीची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली.

          तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, युवासेना तालुका प्रमुख हणमंत राजगे, शहरप्रमुख वैभव गुरव, युवासेना शहर प्रमुख अनिल मासाळ, तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांनी आपल्या प्रभावी भाषणात स्पष्ट केले की,

“महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे आणि महायुती धर्म पाळणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र जर म्हसवडमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळाली, तर आम्ही स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आणि विजय मिळवूनच राहणार.”
ते पुढे म्हणाले,

“म्हसवड शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न गंभीर आहे. या भागात होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी आमचे उद्योगमंत्री उदय जी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यातून म्हसवडमधील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा, हे आमचे प्रमुख ध्येय आहे.”

मुलाणी यांनी सांगितले की म्हसवड नगरपालिकेतील सर्व दहा प्रभागांसाठी संघटनाची पायाभरणी पूर्ण झाली असून, प्रत्येक प्रभागासाठी बूथप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि उमेदवारांची बांधणी करण्यात आली आहे. “आमच्याकडे ताकद कमी असली तरी मनोबल प्रचंड आहे, आणि त्याच बळावर आम्ही नगरपरिषद जिंकून दाखवू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शहरप्रमुख वैभव गुरव म्हणाले,

“आजच्या बैठकीचा उद्देश इच्छुक उमेदवारांची चाचणी घेणे आणि त्यांच्या कल्पना जाणून घेणे हा होता. वरिष्ठांकडून युतीचा आदेश आला तर आम्ही युती धर्म पाळू; अन्यथा स्वबळावर पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ. शिवसेनेकडे असा उमेदवार आहे की तो या निवडणुकीत भूकंप घडवेल.”

बैठकीत मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. काही नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. बैठकीचा शेवट करताना बाळासाहेब मुलाणी म्हणाले,

“आम्ही फक्त लढणार नाही — म्हसवड नगरपालिकेवर भगवा फडकवूनच राहू. येणाऱ्या काळात म्हसवडमध्ये शिवसेना निश्चितच चमत्कार दाखवेल.”

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *