संजय गांधी निराधार पेन्शन व रेशनकार्ड बंदीविरोधात शिवसेनेचा आक्रमक इशारा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड | प्रतिनिधी
कराड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पूर्ण पेन्शन मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड उत्तर तालुकाप्रमुख मा. श्री. संजय (भैय्या) गुलाबराव भोसले यांनी तहसीलदार कराड यांना निवेदन दिले.
शासनाने अपंग लाभार्थ्यांसाठी २५०० रुपये मासिक पेन्शन मंजूर केली असताना, प्रत्यक्षात अनेक अपंगांना फक्त १५०० रुपये मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा अन्याय तात्काळ दूर करून सर्व अपंग, श्रावणबाळ, विधवा तसेच स्वातंत्र्यसैनिकांना नियमित व पूर्ण लाभ दरमहा देण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच, गेल्या २ ते ३ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या संजय गांधी निराधार पेन्शन अर्जांना त्वरित मंजुरी देऊन पेन्शन सुरू करावी, अशीही मागणी निवेदनात नमूद आहे.
याचबरोबर शासनाने २.५ एकरपेक्षा जास्त शेती, १ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न किंवा चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांची रेशनकार्ड बंदी करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. आधीच बंद करण्यात आलेली सर्व रेशनकार्ड कोणत्याही अटीशिवाय पुन्हा सुरू करावीत, असेही स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयांमुळे सर्वसामान्य, गरिब व गरजू घटकांवर अन्याय होत असल्याचे सांगत, आमदार, खासदार व मंत्र्यांनाही निकष लावून त्यांच्या मानधन व योजना बंद करण्यात याव्यात, अशी थेट मागणी शिवसेनेने केली आहे.
जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर सर्व संबंधित घटकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड उत्तर तालुकाप्रमुख मा. श्री. संजय (भैय्या) गुलाबराव भोसले यांचेसह विक्रम पिसाळ, सतीश पाटील,गणेश जांभळे, जीवन गायकवाड,अतुल वैदय, maheshपाटील,भिकाजी भोसले, अभिजित शेटे,अमजद मुसांडे,पोपट कांबळे,प्रसन्न पोळ, पोपट चव्हाण आदी शिवसैनिकाच्या सह्या आहेत

