शिंपी समाजाने आपल्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणून उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशिल रहावे :इंजि सुनील पोरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:
महाबळेश्वर येथील संतशिरोमनी नामदेव महाराज मंदिरात समस्त शिंपी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नामदेव समाजोन्नत्ती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे , अविनाथ गोंदकर,राम सपेकर ,अतुल सलागरे,रमेश बागडे,अजय संदिप माळवदे, पोरे विनायक, किशोर शितळे महेंद्र शिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते वेळी बोलताना पोरे म्हणाले
आज शिंपी समाज सर्वत्र विखुरलेला आहे. वस्त्र, उद्योगाची मुख्य सूत्रे दुसऱ्या समाजाच्या हातात आहेत. हा बदल प्रामुख्याने इंग्रजी राजवटीनंतर झाला. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व पेशवाईच्या काळात राजे, सरदार आणि इतर धनिकवर्गाशी या समाजाचे चांगले संबंध होते. त्यांचे कपडे शिवणे हा मुख्य व्यवसाय होता. त्याकाळी शिंपी समाज हा आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होता. आपत्तीच्या काळात कर्ज देण्यातही या समाजाचा मोठा वाटा होता. काळ बदलत गेला आणि शिंपी समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत सापडला. रेडिमेड कपड्यांचा काळ सुरू झाला आणि शिंपी समाजाच्या व्यवसायाची घसरण सुरू झाली. अन्य समाजातील व्यावसायिकही या क्षेत्रात उतरले. या स्पर्धेत शिंपी समाजाचा टिकाव लागू शकला नाही. त्यामुळे एकेकाळी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या समाजासमोर आर्थिक पेच निर्माण झाला. शिवणकाम व्यवसायाला चांगले दिवस न राहिल्याने या समाजातील ज्येष्ठांनी आपल्या युवा पिढीला शिक्षणासाठी प्रेरित केले. पूर्वी मुला-मुलींचा शिक्षणाकडे फारसा कल नव्हता. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रातही या समाजातील युवा पिढी अग्रेसर होत आहे. शिक्षण क्षेत्रातील ही प्रगती शहरी भागातच दिसून येते. मात्र आजही ग्रामीण भागात हा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, या ग्रामीण भागातील युवकांना चागल्या प्रतीच्या शिक्षणासाठी प्रेरीत केले पाहिजे त्याकरीता मुलांना योग्य सविधा प्राप्त करुन देण्याचे काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून झाले पाहिजे याकरीता प्रथम आपण आपआपसातील सर्व हेवेदावे बाजूला ठेवून संघटीत होणे गरजेचे असल्याचे पोरे यांनी सांगीतले . येत्या काही महिन्यात जिल्ह्यात राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळा व समाज मेळावा आयोजित करण्याचा मानस असल्याचे पोरे यांनी सांगितले.यावेळी इंजि.सुनील पोरे यांचे हस्ते नामदेव ज्ञानामृत पुस्तकाचे वाटप करण्यात आले