करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागा शासकीय कार्यालयांना देण्याबाबत कार्यवाहीच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

बातमी Share करा:

मुंबई,  :

करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाच्या ताब्यात असणाऱ्या जागेमधील त्यांना आवश्यक असणारी जागा वगळून इतर उपलब्ध जागा शासकीय कार्यालये आणि इतर प्रयोजनासाठी  उपयोगात आणण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज शेंडा पार्क येथील जमीन विविध प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याच्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री दीपक केसरकर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागेत जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, हवामानशास्त्र प्रयोगशाळा, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालय, वखार महामंडळ गोडावून आणि कार्यालय, समाजकल्याण वसतिगृह, करवीर पोलिस ठाणे, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, प्री एनडीए अकादमी, आय टी पार्क आदी प्रयोजनासाठी जागा आवश्यक आहे. सध्या कृषी आणि आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेली जागा उपयोगात आणण्याबाबत संबंधित विभागांचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करावी. कृषी आणि आरोग्य विभागाला त्यांच्या विविध प्रयोजनासाठी आवश्यक असलेली जागा वगळता इतर जागा या इतर प्रयोजनासाठी उपयोगात आणण्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!