दहिवडीत शरद पवारांचा हल्लाबोल: महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला

दहिवडी, दि. १६ (प्रतिनिधी):

      माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दहिवडी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत महिलांवरील वाढत्या अत्याचारांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, आरक्षण, आणि सिंचनाच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले.

महिला असुरक्षिततेवर सरकारवर प्रश्नचिन्ह
शरद पवार म्हणाले, “या सरकारच्या कार्यकाळात देशभरात ६७,३८८ महिलांवर अत्याचार झाले आहेत. अशा परिस्थितीत ‘लाडकी बहीण’ म्हणणारे सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. जर खरोखरच सरकारला महिलांचे हित साधायचे असेल तर ही दुटप्पी भूमिका सोडून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. आता महिलाच अशा सरकारला हद्दपार करतील.”

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडीचा भर
पवारांनी शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीवरही भाष्य केले. “कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, आणि सरकार केवळ आश्वासने देत आहे. या मतदारसंघातील सिंचनाच्या प्रश्नावर आम्ही ठोस भूमिका घेणार आहोत,” असे पवारांनी सांगितले.

महाविकास आघाडीचा विजय निश्चित’
तुम्ही एकदिलाने सर्व जण काम करीत आहे. त्यामुळे विजय सोपा झाला आहे.
शरद पवारांनी मतदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. “लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी घार्गे यांची निवड गरजेची आहे. या तालुक्याचे नेतृत्व पूर्वी कै. सदाशिवराव पोळ आणि कै. भाऊसाहेब गुदगे यांनी प्रभावीपणे केले. आता तुमचे सहकार्य घार्गे यांना मिळाल्यास तालुक्याचा विकास गतीने होईल,” असे ते म्हणाले.

उपस्थित मान्यवरांचे आश्वासन
खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आरोग्य विम्यासाठी २५ लाखांपर्यंतचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. तसेच, तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. “स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून येथील तरुणांना संधी दिली जाईल,” असेही त्यांनी जाहीर केले.

न्यायासाठी घार्गे यांना संधी द्या’
प्रभाकर घार्गे म्हणाले,मागील निवडणुकीत आम्ही कमी पडलो. मात्र, आता ही निवडणुक जिंकणार. त्यामुळे गोरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका करतायेत. परंतु मी काय आहे हे तालुक्याला माहिती आहे. आणि गोरे काय आहेत हे पण तालुक्याला माहिती आहे. अन्याय थांबायचा असेल तर एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन मला आमदार करा, तुमची सेवा करायला कुठेही कमी पडणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई यांनीही विदयमान आमदारांवर टीका करतघार्गे ना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, अभयसिंह जगताप, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, उत्तम जानकर , सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, अनिल पवार, रणजित देशमुख, पिंटू मांडवे, किशोर सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि घार्गे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

मतदारांमध्ये उत्साहाचा माहोल
या सभेमुळे माण-खटाव मतदारसंघात प्रचाराला आणखी गती मिळाली असून, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात उर्जितावस्था पाहायला मिळत आहे.

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!