पुळकोटी (ता. माण ) येथील ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा तपास उघड — दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपी जेरबंद

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड / प्रतिनिधी : 

पुळकोटी (ता. माण, जि. सातारा) येथे घडलेल्या ज्येष्ठ नागरीक महिलेच्या खुनाचा थरारक गुन्हा अखेर दोन महिन्यांच्या सततच्या तपासानंतर उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा, म्हसवड पोलिस ठाणे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वडूज यांच्या संयुक्त पथकाने आरोपीस अटक केली आहे.

दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास मौजे पुळकोटी येथे ६५ वर्षीय महिलेचा अज्ञात इसमाने खून करून पुरावे नष्ट केले होते. म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२५ भा.दं.वि. कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा अत्यंत गुंतागुंतीचा व संवेदनशील स्वरूपाचा असल्याने तपासात पोलिसांना अनेक दिशांनी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

सदर गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलिस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले.
या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत (दहिवडी विभाग), पोलीस निरीक्षक अरुण देवकर (स्थानिक गुन्हे शाखा सातारा) यांनी अथक परिश्रम घेत चौकशीला गती दिली.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरताव (ता. माण) परिसरातील एक युवक गुन्हा घडल्यानंतर अचानक गायब झाला आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयिताचा मागोवा घेतला. काही दिवसांच्या तपासानंतर त्याला गुप्त ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले.
सलग पाच ते सहा तासांच्या चौकशीनंतर त्याने खुनाची कबुली दिली असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

घटनास्थळी मिळालेली ‘हुडी जॅकेट’ बनली ठोस धागा :
घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या हुडी जॅकेटवरील “When granted everything, You can’t do Anything – जेव्हा नियतीला सर्व काही मान्य असते, त्यावेळी तुम्ही काहीही करू शकत नाही” या टॅगलाइनने तपासादरम्यान अधिकारी वर्गाला एक प्रेरणादायी संदेश दिला. त्या प्रतीकातूनच तपास पथकाने चिकाटी न सोडता सत्य उघड केले.

या तपास मोहिमेत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातिर, सपोनि अक्षय सोनवणे, पोउनि अनिल वाघमोडे, सपोनि दत्तात्रय दराडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिस ठाण्याचे अनेक अंमलदार सहभागी होते.
शिवाजी गुरव, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, सनी आवटे, अमोल माने, मुनिर मुल्ला, विजय निकम, गणेश कापरे, राजू कांबळे, धीरज महाडीक, स्वप्निल दौंड यांसह सर्व पथकाने संयम, बुद्धिमत्ता आणि चिकाटीने तपास पूर्ण केला.

सदर कारवाईत मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *