व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कोर्टी उब्रज कराड तालुक्यातील कोर्टी गावाची रहिवासी वैष्णवी दत्तात्रय कदम हिची ठाणे अंमलदार (पोलिस कॉन्स्टेबल) पदावर निवड झाल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता, वैष्णवीने केवळ स्वत:च्या जिद्द, परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर हे मोठे यश मिळवले आहे.
वैष्णवीने पोलीस भरतीसाठीचा सराव स्वत:च्या प्रयत्नांनी नियमितपणे केला आणि आता ती ठाणे अंमलदार पदावर काम करत आहे. तिचे प्रशिक्षण अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पूर्ण झाले असून सध्या ती मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहे.
गावी परतल्यावर गावकऱ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात तिचे भव्य स्वागत केले. या आनंदमय प्रसंगी गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैष्णवीने आपल्या स्वागताच्या वेळी बोलताना सांगितले की, “आजच्या पिढीने सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी मेहनत आणि सातत्यावर लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच यश मिळू शकते.”
वैष्णवीच्या शिक्षणाची पायाभरणी कोर्टी येथील जिल्हा परिषद शाळेत झाली, तर उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, उंब्रज येथे झाले. या यशस्वी प्रवासात तिला परिवाराचा आणि गावकऱ्यांचा मोलाचा पाठिंबा लाभला.
सत्कार कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये दत्तात्रय कदम, अंजना कदम, सतीश बाकले, सर्जेराव बाकले, अविनाश बाकले, रामचंद्र पवार, कैलास पिसाळ, सुरज पाटील, नवनाथ यादव, महेश यादव आणि राजेंद्र थोरात यांचा समावेश होता.
वैष्णवीच्या या यशामुळे तिचे कुटुंब आणि गाव अभिमानाने भरून गेले आहे.