विद्यार्थी सुरक्षा अभियानातून शाळकरी मुलांना दिलासा — म्हसवड पोलिसांची स्तुत्य कल्पना
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड प्रतिनिधी |
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हसवड पोलिस स्टेशनच्यावतीने “विद्यार्थी सुरक्षा अभियान” राबवले जात असून, या उपक्रमाद्वारे शाळांमध्ये भेट देत मुलांमुलींच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याचे त्वरित निवारण करण्यात येत आहे.
या अभिनव उपक्रमाची संकल्पना सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. तुषार दोशी यांची असून, म्हसवड पोलीस स्टेशनचे स. पो. नि. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे.
याच उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरताव येथे पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल थोरात, महिला कॉन्स्टेबल हर्षदा गडदे आणि पोलीस हवालदार सुनिल बोडरे यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांच्या शंका व भीती दूर केल्या.
पो. कॉ. राहुल थोरात यांनी मुलांना सांगितले, “जर कोणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल, विनाकारण मारहाण करत असेल तर घाबरू नका – आम्हाला किंवा तुमच्या शिक्षकांना लगेच सांगा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
महिला पोलीस हर्षदा गडदे यांनी मुलींशी संवाद साधताना, “तुमच्यावर अन्याय किंवा अत्याचार झाल्यास संकोच न करता पोलीसांशी त्वरित संपर्क साधा,” असे स्पष्टपणे सांगितले.
यावेळी एक लहान मुलगा पोलिसांना पाहून घाबरून रडू लागला, मात्र पोलीस दादांनी त्याचे अश्रू पुसून त्याला समजावून सांगितल्याने विद्यार्थ्यांमधील पोलिसांबद्दलची भीती कमी झाली आणि विश्वास निर्माण झाला.
या उपक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे, शिक्षक अनिल पाटोळे तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
“विद्यार्थी सुरक्षा अभियान”मुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होत असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.