सातारा जिल्हा परिषद निवडणूक २०२६ : कुक्कुडवाड गटातून बहुजन समाज पार्टीचे प्रथमेश केंगार मैदानात; ‘हत्ती’ चिन्हावर मतदानाचे आवाहन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुक्कुडवाड :-प्रतिनिधी
– सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत १६ कुक्कुडवाड गटातून बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रथमेश चंद्रकांत केंगार हे निवडणूक रिंगणात उतरले असून स्थानिक पातळीवर त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने “बहुजनाची लढाई – परिवर्तनाची वाटचाल” हा नारा देत केंगार यांनी मतदारांपर्यंत विकासाचा अजेंडा पोहोचवण्यावर भर दिला आहे. गावागावांत भेटीगाठी, पदयात्रा, सभा व कोपरा बैठकीतून त्यांनी पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजनांचे आश्वासन दिले आहे.
प्रथमेश केंगार हे युवक नेतृत्व म्हणून ओळखले जात असून सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तरुण मतदारांसह महिला व शेतकरी वर्गातून त्यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. “स्थानिक विकासाला प्राधान्य देऊन पारदर्शक कारभार करणार,” अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे.
या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे निवडणूक चिन्ह ‘हत्ती’ असून मतदारांनी मतदानाच्या दिवशी हत्ती या चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मतदान गुरुवार, दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत होणार असून सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून परिवर्तनासाठी साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाची निवडणूक कुक्कुडवाड गटात चुरशीची होण्याची शक्यता असून बहुजन समाज पार्टीकडून ‘परिवर्तनाची लढाई’ लढली जात असल्याने या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

