सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित, गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम किल्ले अजिंक्यतारा
व्हिजन२४ तास न्यूज
गोंदवले खुर्द ;( प्रतिनिधी) सादिक शेख
दिनांक १५/०१/२०२३ रोजी मकरसंक्रात सणाचे औचित्य साधून “आपले किल्ले आपली
जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत अजिंक्यतारा गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम
राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये सातारा उपविभागातील सातारा शहर, सातारा तालूका,
शाहुपूरी, बोरगांव या पोलीस ठाणेकडील व पोलीस मुख्यालय स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा
विशेष शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच
सातारा पोलीस दलातर्फ सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा
शहरातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान अजिंक्यतारा
किल्लावर दक्षीण दरवाजा मार्गे चढाई (ट्रेक) करण्यात आली तसेच समुह तयार करुन किल्ल्यावर
नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेला
जैविक व अजैविक अंदाजे २१० किलो कचरा नगरपालिकेच्या दोन कचरा गाडयामधून कचरा
डेपोत पाठवण्यात आला. त्यानंतर उत्तर दरवाज्याजवळील मारूती मंदीर येथे दुर्ग संवर्धन आणि
शिव-शंभू चरित्र प्रचार व प्रसारक श्री. संतोष गोलांडे यांनी अजिंक्यतारा किल्ल्याबाबत व किल्ले
संवर्धनाबाबत माहिती दिली. तसेच दातार शेंदुरे इंग्लिश मिडीयम स्कूल, एनसीसी पथक, सातारा
यांनी जागृतीपर पथनाटय सादर केले.
सदर मोहिमेमध्ये श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, पोलीस उप अधीक्षक
श्री. शिंदे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा श्री. देवकर, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष
शाखा, श्री. पाटील, राखीव पोलीस निरीक्षक श्री. आलदार व इतर शाखांकडील अधिकारी असे
२६ पोलीस अधिकारी, १५७ पोलीस अंमलदार व १०८ नागरीकांनी सहभाग घेतलेला होता. तसेच
या मोहिमेअंतर्गत यापुढे प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची
मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे
सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. या
मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.