सातारा जिल्हा पोलीस दलाला ३६ नव्या वाहनांची व अत्याधुनिक साधनसामग्रीची भेट पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत होणार मोठी वाढ

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी – सादिक शेख, सातारा |

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, जिल्हा नियोजन समिती सातारा यांच्या मदतीने एकूण ३६ नवी वाहने व अत्याधुनिक साधनसामग्री पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली आहे. या सुविधांचा लोकार्पण सोहळा आज, शनिवार दिनांक ०१ जून २०२५ रोजी पोलीस कवायत मैदान, हजेरी माळ, सातारा येथे पार पडला.

हा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभुराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा पोलीस दलास १५ महिंद्रा स्कॉर्पीओ, १ महिंद्रा थार, ४ एसएमएल बस, १६ हिरो प्लेजर स्कूटी अशा एकूण ३६ नव्या वाहनांसह विविध अत्याधुनिक साधनसामग्रीचा समावेश असलेले साहित्य वितरित करण्यात आले.

या सुविधांमध्ये ५० सीसीटीएनएस संगणक, ५६ संगणक, ५६ प्रिंटर, ८२ स्कॅनर, ५६ युपीएस, ४० बॉडी वॉर्न कॅमेरे, ४० ब्रीथ अल्कोहोल अॅनालायझर मशिन, १० ट्राफिक बुथ, ३०० रोड बॅरिकेटस् व २०० फोल्डिंग रोड बॅरिकेटस् यांचा समावेश आहे. या आधुनिक उपकरणांमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीस मोठी चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संपूर्ण प्रास्ताविक सादर केले. त्यांनी या साधनसामग्रीच्या मागणीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिल्याचे नमूद केले.

या लोकार्पण कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते. या नव्या सुविधांमुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता वाढून नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळणार असल्याचा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!