सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उ्घाटनाचा १४ रोजी स्वप्नपूर्ती सोहळा
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेल्या हृदयस्पर्शी अशा एका स्वप्नाची पूर्तता झाली असून या स्वप्नपूर्तीचा दिमाखदार सोहळा बुधवार दि. १४ फेबु्रवारी २०२४ रोजी सातार्यात गोडोली येथील साईबाबा मंदिराजवळ व हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर होत आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार भवन समितीने साकारलेल्या ‘सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे’ उद्घाटन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते होत असल्याची माहिती पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
१०० वर्षांहून अधिक दिमाखदार पत्रकारितेची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात पत्रकारांचे हक्काचे सातारा जिल्हा पत्रकार भवन नव्हते. सातार्यात जिल्हा पत्रकार भवन व्हावे, अशी मनोमन इच्छा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराच्या मनात गेल्या कित्येक वर्षांपासून घर करुन होती. सातारा जिल्हा पत्रकार संघाने हे शिवधनुष्य लिलया स्वीकारले होते. त्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक खस्ता खाल्ल्या. अनेक वर्षे जिल्हा पत्रकार भवन व्हावे यासाठी नुसत्या चर्चा झडत होत्या. प्रत्यक्ष जिल्हा पत्रकार भवन आकाराला येत नव्हते. मात्र, सातारा जिल्हा पत्रकार संघाने नेटाने प्रयत्न करुन अनेक अडचणी व समस्यांवर मात करत अखेर सातारा जिल्हा पत्रकार भवन साकारलेच. गोडोली येथील साईबाबा मंदिरापासून जवळ किल्ले अजिंक्यतारा रस्त्याला हे ‘सातारा जिल्हा पत्रकार भवन’ व साहित्य सदन साकारले असून बुधवारी सकाळी ११ वाजता त्याचे उद्घाटन होत आहे. त्यानंतर गोडोलीतील हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनजवळील सभागृहात मुख्य स्वप्नपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे.
