वडूजच्या संत नामदेव मंदिरासाठी निधी कमी पडू देणार नाही : सुनील पोरे यांची ग्वाही* वडूजमध्ये समाज बांधवांची बैठक उत्साहात
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हस वड
: वडूजमधील शिंपी समाजबांधवांची अनेक वर्षांची इच्छा असलेले संत शिरोमणी श्री नामदेव महाराज मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास जावे, यासाठी प्रयत्नशील राहू व त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष अभियंता सुनील पोरे यांनी दिली आहे.
वडूज येथे संपन्न झालेल्या समाजबांधवांच्या बैठकीत श्री. पोरे बोलत होते. समाजातील नवे- जुने सर्व कार्यकर्ते व महिलांसह या बैठकीस कुंजन पेट्रोल पंपाचे संचालक देविदास पोरे, सिटी मॉलचे विजय चांडवले, एसटी खात्यातील चंद्रकांत पोरे, प्रकाश डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात सन-1907मध्ये नामदेव शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नामदेव समाजोन्नती परिषदेच्या झेंड्याखाली संघटित राहून आपला विकास साधावा, असे आवाहन करीत समाज बांधवांशी संवाद साधताना श्री. पोरे म्हणाले की, धाग्याने कापड जोडण्याची खासियत असणाऱ्या समाजबांधवांनी सध्याच्या गतिमान युगातही एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी सर्वतोपरी मदत करावी व माणूस माणूस जोडावा. मतभेद विसरून “शिंपी सारा एक” हा मंत्र जपायला हवा. सर्वांना सोबत घेतले तर प्रगती आजिबात दूर नाही. एकमेकांना भेटल्यावर “जय नामदेव ” म्हंटल्याने आपुलकी निश्चितच वाढेल. फक्त मरणदारी आणि तोरणदारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचारविनिमय करावा. वडूजमधील नामदेव मंदिरासाठी सर्व स्तरातून निधी आणून लवकरात लवकर मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात संत नामदेव मंदिरांच्या उभारणीसाठी आपण कटिबद्ध आहोत असेही श्री. पोरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
विजय खटावकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नितीन लंगडे यांनी प्रास्ताविक, सुयोग लंगडे यांनी सूत्रसंचालन तर योगेश डोंगरे यांनी आभार मानले. विजय खटावकर, सुनील कांबळे, बंटी लंगडे, विशाल डोंगरे आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली. बैठकीच्या प्रारंभी नियोजित नामदेव मंदिराच्या जागी असलेल्या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या सहविचार सभेस चंद्रकांत यवतकर, रमेश डोंगरे, सुनील मुळे, प्रशांत कांबळे, मंगेश लंगडे, मिलिंद लंगडे, सोमनाथ येवतकर, सौ. शारदा भस्मे, सौ. लीना लंगडे आदिंसह सर्व प्रमुख समाज बांधव उपस्थित होते.
*चौकट* _नवी पिढी मंदिराचा पाया व कळस उभारेल_
वडूजच्या नामदेव मंदिरासाठी दहा लाखाहून अधिक रकमेचा निधी मिळवून देण्याची ग्वाही सुनील पोरे यांनी त्यांच्या भाषणात देताच जुन्या मंडळींनी जागा उपलब्ध करून दिली आता नव्या पिढीने मंदिराचा पाया व कळस उभारेल, अशी खात्री या सहविचार सभेत उपस्थित समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केली