महात्मा बसवेश्वर महामंडळासह संत काशिबा गुरव महामंडळ कार्यान्वित गरजूंना योजनेचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
मुंबई, दि. २५ :
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे. या महामडळांमार्फत राज्यातील गुरव व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. या महामंडळाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गुरव व लिंगायत समाजाच्या लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर/ उपनगर जिल्हा व्यवस्थापक किशोर म्हस्के यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
कर्ज योजनांची माहिती खालीलप्रमाणे
ऑनलाईन कर्ज योजना– राष्ट्रीयकृत , नागरी, सहकारी, शेड्यूल्ड- मल्टिशेड्यूल्ड बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या दरमहा नियमित परतफेड केलेल्या हप्त्यावरील १२ टक्क्ये पर्यंतच्या व्याजाच्या व ५ वर्ष पर्यंतच्या मुदत कर्जावरील व्याज रकमेचा परतावा लाभार्थ्यास ऑनलाइन पद्धतीने बचत खात्यात महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. लाभार्थ्यांनी बॅंकेकडे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. ऑनलाइन कर्ज योजनांसाठी अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाइटवर अर्ज करावा.
१) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना– व्यापार उद्योग, सेवा व शेतीपूरक व्यवसायासाठी लागणारे कर्ज, कर्ज मर्यादा १० लाख रुपये पर्यंत, अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत.
२) गटकर्ज व्याज परतावा योजना- बचत गट, भागीदारी संस्था (निबंधक मुंबई प्राधिकृत), सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत)इ. कर्ज मर्यादा १० ते ५० लाख रुपये, गटातील सभासदांची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये पर्यंत.
३) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना– पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी कर्ज, देशांतर्गत शिक्षणासाठी १० लाख रुपये, विदेशात शिक्षणासाठी २० लाख रुपये. (अभ्यासक्रम- आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक –व्यवस्थापन, कृषी , अन्न प्रक्रिया व पशु विज्ञान.) अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये पर्यंत.
४) महिला स्वयंसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना– महिला बचतगटांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येईल. प्रथम टप्प्यात ५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता व कर्ज परतफेडीनंतर द्वितीय टप्प्यांत १० लाख रुपये कर्ज घेण्यास पात्र.
ऑफलाईन कर्ज योजना
१) थेट कर्ज योजना– १ लाख रुपये कर्ज महामंडळामार्फत, नियमित कर्ज परतफेडीवर व्याज आकारले जाणार नाही. थकित कर्जावर ४ टक्के व्याज आकारले जाईल. कर्ज परतफेड कालावधी ४ वर्षे (२०८५ रुपये मासिक हप्ता), अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपयापर्यंत.
२) बीज भांडवल कर्ज योजना– राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत राबविण्यात येईल. कर्जमर्यादा ५ लाख रुपये, बॅंक मंजूर कर्ज रकमेत महामंडळ सहभाग २० टक्के व बॅंकेचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थ्याचा सहभाग ५ टक्के असेल. व्याजदर महामंडळ सहभागावर ६ टक्के बँकेच्या सहभागावर प्रचलित बँक व्याजदरानुसार, अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये पर्यंत.
पात्रतेचे निकषः– लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व इतर मागासवर्गीय असावा. महामंडळ, बॅंक अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ घेता येईल. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे, निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान, अनुभव असणे आवश्यक, कर्जाच्या अटी शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे असतील. सर्व व्याज परतावा योजनांसाठी लाभार्थ्याने कर्ज मंजुरीसाठी बॅंकेकडे जाण्यापूर्वी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे.
गुरव व लिंगायत समाजाच्या बांधवांनी योजनांची अधिक माहिती, ऑफलाइन कर्ज योजनांच्या अर्जासाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, गृहनिर्माण भवन, खोली क्रमांक ३३, तळमजला, कलानगर वांद्रे (पूर्व) जिल्हा मुंबई. दूरध्वनी क्रमांक (०२२) २२३५५९७५४१ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.