कराडमध्ये सैनिक सन्मान रॅली आणि सैनिक मेळावा संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड, १० ऑक्टोबर २०२४:
भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी कराडमध्ये भव्य सैनिक सन्मान रॅली व सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात प्रीती संगम येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करण्यात आली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यानंतर विजय दिवस चौक येथे विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान परिसरात भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी कराड शहर दणाणून गेले.

तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र सैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून सैनिक सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर आयोजित सैनिक मेळाव्यात लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, उपसंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा, यांच्या प्रमुख उपस्थितीत सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींवर चर्चा झाली.

यावेळी 78 वर्षीय महादेव घाडगे, जे 1965 व 1971 च्या युद्धांमध्ये सहभागी झाले होते, परंतु अजूनही पेन्शन व सुविधा न मिळाल्याने त्यांनी आपली समस्या मांडली. तत्काळ महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागाने त्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन व CSD कॅन्टीन कार्ड देण्याचे आश्वासन दिले.

सैनिक मेळाव्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सैनिकांच्या समस्या मांडल्या व उपसंचालकांना निवेदन सादर केले. कार्यक्रमात विविध सैनिक संघटनांचे प्रमुख आणि लायन्स क्लब कराडचे सदस्य उपस्थित होते.

आभार प्रदर्शन श्री कृष्णा पाटील यांनी केले, तर चंदू काका सराफ यांनी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी पाणी व कॉफीची व्यवस्था केली होती.

भारत माता की जय! वंदे मातरम!


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!